सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट

सोलापूर : जिल्ह्यातील माढा, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्‍यांमध्ये ठिकठिकाणी आज सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह गाराच्या पावसाने हजेरी लावली. उकाड्यामुळे हैरान असलेल्या नागरिकांना या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे फळांना बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशातच या आस्मानी संकटाने पुन्हा शेतकऱ्यांना मारले आहे. वादळी वारे आणि गारांच्या पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे कांदा, केळी, डाळिंब, द्राक्षे, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


शेतकऱ्यांचा पाय खोलात 
कोरोनाने फळांना बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशातच आस्मानी संकटाने पुन्हा शेतकऱ्यांना मारले आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा पाया गारांच्या पावसाने आणखी खोलात गेला आहे. वादळी वारे आणि गारांच्या पावसाने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जैनवाडी (ता. पंढरपूर) येथील सुरेश दानोळे यांच्या डाळिंब बागेला मोठा फटका बसला आहे. गारा आणि वादळी वाऱ्याने दोन एकरांतील डाळिंबाची फूलगळ झाली आहे. अन्य शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.

कुंभारगावात लिंबाच्या झाडावर पडली वीज 
करमाळा तालुक्‍यातील कुंभारगाव, सावडी, राजुरी परिसरात सायकांळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी कुंभारगाव येथे लॉकडाउनने बंदोबस्ताला असलेल्या पोलिस चौकीपासून जवळच असलेल्या लिंबाच्या झाडावर वीज पडली. त्यामुळे लिंबाचे झाडे पेटले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांदा भिजला, भुईमुगाला मात्र जीवदान
आज झालेल्या पावसाने फळबागांचे आणि उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारभाव नसल्याने शेतात पडून असलेला कांदा भिजला आहे. अचानक झालेल्या गारपिटीने काढणीला आलेल्या मूग, उडीद पिकाचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र सुकत असलेल्या भुईमूग पिकास या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.

फळबागायतदार चिंचेत 
संचारबंदी लागू असल्याने फळबागातील फळे पडून आहेत. काही फळबागा सोडून द्याव्या लागत आहेत. त्यातच या वादळी वाऱ्याने व पावसामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. आंबा, द्राक्षे, पपई, केळी या फळबागांचे पावसाने नुकसान झाले आहे.

माढ्यातील गावांत गारपिटीचा तडाका 
या पावसाने जिल्ह्यात अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले तसेच शेतातील कडबाही उडून गेला आहे. माढा तालुक्‍यात शेतातील पिके पावसाने भुईसापाट झाली होती. माढा तालुक्‍यात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर दुसरीकडे रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. शेतातील ताली व लहान डबके या पावसामुळे भरली आहेत. तर दुसरीकडे वादळी वारे सुरू होताच विद्युत प्रवाह खंडित झाला होता. गारांच्या तडाख्याने अनेकांच्या गाडीला तडे गेले आहेत. एकंदरीत अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यासह गारपीटने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

द्राक्ष बागांचे दुहेरी नुकसान 
आधीच लॉकडाउनने मागील एक ते दीड महिन्यापासून कांदा बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काढलेला कांदा तसाच पडून आहे. तर लॉकडाउनने काही ठिकाणच्या द्राक्ष बागांची तीच अवस्था आहे. अगोदरच बेदाणा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना साठवणुकीला शेड उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे. तुरळक ठिकाणी आलेल्या आंब्याच्या कैऱ्याही कालच्या वादळी वाऱ्याने गळून पडल्या असून यावर्षी गावरान आंबे मिळणे मुश्‍कील होईल, असे चित्र आहे.

भाळवणी, जैनवाडीत पिकांचे मोठे नुकसान 
पंढरपूर : पंढरपूर तालुक्‍यातील भाळवणी, जैनवाडी भागात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने काढणीस आलेली द्राक्षे, आंबा पिकांसह अन्य फळ पिकांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. आज सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. त्यातच मेघगर्जेनेसह गारांचा पाऊस झाला आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील जैनवाडी, भाळवणी, गार्डी परिसरात लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस झाला. गारांच्या तडाख्याने काढणीस आलेले द्राक्षे, आंबे, डाळिंब फळांना तडे गेले आहेत.

उपळाई बुद्रूक परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान
उपळाई बुद्रूक : उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झालेल्या माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक, उपळाई खुर्द, चिंचोली, रोपळे खुर्द, वडाचीवाडी गावांत रविवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. लॉकडाउनने घरात बसून नागरिकांना कंटाळा आला आहे. त्यात दिवसभर उकाडा हैराण करत आहे. अशातच रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होताच काही मिनिटांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुरू झाले व जोरदार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर वाढत असताना गारांचा पाऊस सुरू झाला. सुमारे तासभर पडलेल्या पावसात अर्धा तास गारांचा पाऊस झाला.

बार्शीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस 
बार्शी : बार्शी शहर व तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह सुमारे पाऊण तास अवकाळी पाऊस झाला. उन्हाने लाहीलाही होत असताना झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. मे महिना सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस तापमानात वाढच होत होती. लॉकडाउनने घरातच बसलेल्या लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले होते. रविवारी सायंकाळी पाचनंतर अचानक हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. सुमारे पावणेसहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.

साडे परिसरात पाऊस 
करमाळा/साडे ः साडे (ता. करमाळा) येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेडवरचे, घरावरचे पत्रे उडाले आहेत. वादळी वाऱ्याने अनेक मोठी झाडे आणि त्यांच्या फांद्या मोडल्या आहेत. विजेचे खांब पडल्याने साडे व परिसरातील वीजपुरवठा बंद आहे.

मंगळवेढ्यात अनेक गावे अंधारात
मंगळवेढा : कोरोनाची भीती आणि उकाड्याने हैराण झालेल्या मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह हलक्‍या पावसाने हजेरी लावली. हवेत गारवा निर्माण झाल्याने जनतेला दिलासा मिळाला असला तरी वाऱ्याने तुटलेल्या तारांमुळे निंबोणी के.व्ही. उपकेंद्र अंतर्गत येणारी निंबोणी, चिक्कलगी, जित्ती, भाळवणी, रड्डे, सिद्धनकेरी, जालीहाळ, बावची गावे अंधारात होती.

पांडे परिसरात अवकाळी पाऊस 
पांडे : करमाळा तालुक्‍यातील हिसरे, फिसरे, पांडे, अर्जुननगर, म्हसेवाडी, मीरगव्हण आदी गावांत : वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसात लहान मुलांनी गारा वेचण्याचा व भिजण्याचा आनंद लुटला.

नातेपुते परिसरात पाऊस 
नातेपुते : नातेपुते व परिसरात सायंकाळी सातपासून पावसाचे वातावरण होते. साडेसातपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. सुमारे मिनिटे पासून झाला.

अकलूज परिसरात हजेरी 
अकलूज : अकलूज व परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी जोराचे वादळ सुटले. या वादाळासह पावसाचे निर्माण झाले. सुमारे अर्धा तास मध्यम पाऊस पडला.

पानगावमध्ये सर्वांचीच धांदल 
पानगाव : जोरदार वाऱ्यासह पानगाव व परिसरात रविवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. सायंकाळी चार वाजल्यापासून पावसाचे वातावरण होते. पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसाने सर्वाचीच धांदल उडाली.