Success Story: बँकेतली नोकरी सोडली, सोलापूरच्या पल्लवी गुळाच्या चहाचं प्रीमिक्स विकून महिन्याला 5 लाख कमवतात, काय आहे यांची गोष्ट? वाचा

 पल्लवीने पाच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये गुळाच्या चहाचे प्रीमिक्स केले. हर्बल, तुळस, मसाला, विलायची आणि आयुर्वेदिक अशा पॅकेजमध्ये तिनं ही प्रीमिक्स पाकिटे करायला सुरुवात केली.


Solapur Success: आजकाल अनेकांचा नोकरीच्या सरधोपट मार्गाने पैसा कमवण्यापेक्षा काहीतरी हटके करण्याकडे कल असतो. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीच्या दैनंदिन आयुष्यात आजकाल चांगल्या आरोग्यासाठी साखर वगळण्यासाठी अनेकजण गुळाचा चहा पिणं पसंत करतात.  चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही असे आपल्या जवळपास कितीतरी लोक दिसतात.हेच लक्षात घेऊन सोलापूरच्या पल्लवी धनराज वाळे यांनी पारंपरिक चहासाठी एक आरोग्यदायी पर्याय तयार करण्यास सुरुवात केली. (Solapur Success Story)

पल्लवीने पाच वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये गुळाच्या चहाचे प्रीमिक्स केले. हर्बल, तुळस, मसाला, विलायची आणि आयुर्वेदिक अशा पॅकेजमध्ये तिनं ही प्रीमिक्स पाकिटे करायला सुरुवात केली. याला जोडून गुळाची बिस्कीटे, करी पावडर, कडक ब्रेड, वेगवेगळ्या चटण्यांचंही पॅकेजींग तिने सुरु केलं आणि आता या व्यवसायातून त्यांचं महिन्याचं उत्पन्न 5 लाख रुपये एवढं आहे.कोणत्याही व्यवसायात ग्राहकांची गरज आणि मागणीचं गणित लक्षात घेतलं की कोणताही व्यवसाय मोठा होतो हे पल्लवी वाळे यांच्या या व्यवसायातून शिकण्यासारखं आहे.

काय केलं पल्लवीनं?

मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी पल्लवीने एक मोठा निर्णय घेतला  आणि तिने आपली स्थिर बँकेतली नोकरी सोडली. कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. पण यासोबतच, तिला काहीतरी वेगळं करण्याची इच्छाही होती.गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी आरोग्यासाठी लाभदायक गूळ वापरण्याची संकल्पना तिला मनापासून पटली. त्यामुळे तिने पारंपरिक चहाला एक आरोग्यदायी पर्याय म्हणून गुळाचा चहा विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला. तिच्या  चिकाटीमुळे आणि गुणवत्तेवर दिलेल्या भरामुळे हा उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. आज, पल्लवीचा हा व्यवसाय महिन्याला तब्बल 5 लाख रुपयांचे उत्पन्न कमवत आहे! तिच्या कल्पकतेने आणि मेहनतीने तिला यशस्वी उद्योजक बनवलं आहे, आणि तिची ही कहाणी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गुळाच्या चहाचा ट्रेंड, अनेक उद्योजकांकडून झाला प्रयोग

काही वर्षांपूर्वी साध्या चहा टपऱ्यांवर येथे गुळाचा चहा मिळेल अशा पाट्या दिसायला लागला आणि सगळीकडेच गुळाच्या चहाचा ट्रेंड वाढला. साखरेऐवजी गुळाच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे पल्लवीने ही जागरुकता लक्षात घेतली. आणि पारंपरिक चवीला एक नवा ट्विस्ट देत स्वत:चा बिझनेस सुरु केला.  हा ट्रेंड ओळखून पल्लवीसारख्याच कित्येकांनी हा ट्रेंड ओळखून अशा प्रकारचा व्यवसाय सुरु केला होता. काही वर्षांपूर्वी अहमदनगरच्या नितीन नागरे यांनी गुळावर आधारित चहा तयार करण्याचा प्रवास सुरू केला. पारंपरिक पद्धतींमध्ये गूळ दुधात मिसळल्यानंतर घट्ट होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक प्रयोग केले. अखेरीस, त्यांनी असा फॉर्म्युला विकसित केला की ज्या गुळाच्या चहाची चव आणि गुणवत्ता कायम राहिली. त्यांचा ब्रँड फूडिया गुळाचा चहा आज आरोग्यविषयक जागरूक ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. गुळाचा गोडवा फक्त चवदारच नाही, तर तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पारंपरिक खाद्यसंस्कृतीला आधुनिकतेची जोड देत अनेक उद्योजक गुळाच्या उत्पादनांमध्ये नाविन्य शोधत आहेत.

Comments