Solapur Rain Updates : सोलापुरात अतिमुसळधार, सीना नदीला पुन्हा महापुराचा धोका; उळे - कासेगाव पूल पाण्याखाली

 Solapur Rain Updates : सोलापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने सोलापूरला रेड अलर्ट जारी केलाय.



गेल्या आठवड्याभरापासून सोलापूर आणि मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोलापूरमध्ये सीना नदीला महापूर आला. या महापुरात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक गावांमध्ये पाणी घुसल्यानं वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झालीय. दरम्यान, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून सोलापूरसह धाराशीव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. शहरातील रस्त्यांना अनेक ठिकाणी नद्यांचं स्वरुप आलंय. धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. लातूर, बीडमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराचा धोका निर्माण झालाय.

सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोलापूर शहरात शुक्रवारी रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूरसह अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर पुन्हा सोलापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता झाली निर्माण झालीय.

दक्षिण सोलापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढलीय. यामुळे उळे - कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेलाय. यामुळे कासेगावचा संपर्क तुटला आहे. उळे - कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झालीय.

हवामान विभागाने पुढील ३ तासात बीड, जालना, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ४०-५० किमी प्रतितास वेगाने वादळे वारे वाहतील असा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Comments