विझोटेक : 1500 विद्यार्थ्यांनी घडवला तंत्राविष्कार
सोलापूर- समाजाची गरज ओळखून त्यांच्या समस्या कमी करण्याचा जीवनशैली अधिक सुखमय करण्याचा प्रयत्न इंजिनिअर करतो. संशोधन ही आधुनिक काळाची गरज आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात कार्यरत राहणे हे भारताला महासत्ता होण्यासाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे यांनी येथे केले.
सोरेगाव येथील व्हीव्हीपी पॉलिटेक्निक अभियांत्रिकीमध्ये आयोजित विझोटेक प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य धरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विझोटेक या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. २०० प्रकल्प, शोधनिबध, बॉक्स क्रिकेट, क्वीज आदी स्पर्धांत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५०० इतकी आहे. स्पर्धेत सोलार कुलर, अॉटोमेटिक रेल्वे गेट, डॅम अॉटोमेशन, इरिगेशन सिस्टिम, अॅण्ड्राईड, स्मार्ट पेट्रोल सेलिंग सिस्टिम अशा नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता.
यावेळी व्हीव्हीपी संस्थेचे संस्थापक प्रा. जी. के. देशमुख, सचिव अमोल चव्हाण, संचालक रोहित देशमुख, पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस. एम. शेख, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. यू. एस. मुगळे, उपप्राचार्य एस. एन. कुलकर्णी, संयोजक प्रा. आर. व्ही. माढेकर, प्रा. यू. एम. रावत, समन्वयक प्रा. बी. सी. हुस्कामुरी, प्रा. आर. एम. पाटील, प्रा. एस. डी. बुंदाले तसेच शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य शेख म्हणाले,
विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी व्हीव्हीपी दरवर्षी सातत्याने प्रकल्प स्पर्धा शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन करते. अष्टपैलू अभियंते तयार व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. उपप्राचार्य एस. एन. कुलकर्णी यांनी अभियंता प्रकल्प यांचे नाते अतूट असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आत्मकेंद्रीत होऊन प्रकल्प विकत घेता आपल्या कल्पनाशक्तीचा पुस्तकी ज्ञानाचा वापर प्रकल्पासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसाद जोशी वनिता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. यू. के. जाधव यांनी आभार मानले.

Comments