'सैराट' फेम सल्ल्याने दिला बारावीचा पेपर, वाचा बारावीनंतर पुढे काय करणार
मराठी चिञपट सृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या 'सैराट' चित्रपटातील सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख याने मंगळवारी (28 फेब्रुवारी) बोर्डाचा बारावीचा परीक्षेचा पहिला पेपर दिला. गेल्या वर्षी करमाळा तालुक्यात चित्रीत झालेला आणि मराठी सिनेजगतात कोटीच्या कोटी उड्डाणे पार करणा-या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटातील नायक परशाचा मित्र सहकलाकार सल्ल्या उर्फ अरबाज शेख हा मुळचा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील आहे. जेऊर येथीलच भारत कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेत तो शिक्षण घेत आहे. मंगळवारपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. सल्ल्याने जेऊरच्या भारत महाविद्यालयाच्या केंद्रात परीक्षा दिली.
'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन वर्ष होत आहे तरी ही या चित्रपटाची लोकप्रियता आणि त्यामध्ये भूमिका केलेल्या सर्वच कलाकारांनी केलेल्या भूमिकेची आज ही प्रेक्षकात चर्चा होताना दिसते. 'सैराट' चिञपटाचे चित्रीकरण करमाळा, केम, कंदर, शेलगाव-वां, देवळाली या भागात झाले आहे. चित्रीकरण झालेल्या या स्थळांना आज ही राज्यभरातील प्रेक्षक भेटी देऊन पर्यटनाचा आनंद घेत आहेत. तसेच सध्या 'सैराट' चिञपट कन्नड भाषेत तयार करण्यात आला आहे.
बारावी परीक्षा पास होणे जीवनात महत्वाचे असून परीक्षेपूर्वी मी चांगला अभ्यास केला आहे. बारावी नंत्तर नाट्यचित्रपट कलेचे शिक्षण घेणार आहे, असे सल्ल्या उर्फ अरबाज शेख याने सांगितले.

Comments