‘आई, मला मारायला लागलेत, लवकर ये’; काही तासांतच २३ वर्षीय शुभमचा मृत्यू, कारमध्ये सापडला मृतदेह

 Pandharpur Crime:  'आई, इथे मला मारायला लागलेत, लवकर ये, मला वाचव,' असा व्हॉट्सअॅप संदेश आईला पाठवून काही तासांतच २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटनाvरविवारी रात्री पंढरपुरात उघडकीस आली. शुभम मोनाप्पा सुतार (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शुभमने रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आईला लक्ष्मी टाकळी येथील लक्ष्मी हॉटेलचे लोकेशन पाठवून आपल्याला मारहाण होत असल्याचे कळविले. आई तत्काळ तेथे पोहोचली; मात्र शुभम तेथे आढळला नाही.

दरम्यान, रात्री साडे दहाच्या सुमारास शुभमचा भाऊ संदीप याला मित्राची कार दिसली. कारजवळ गेल्यानंतर शुभम मारहाण झालेल्या अवस्थेत व हालचाल नसल्याचे त्याला दिसले. कारमधील तिघांनी 'पंधरा मिनिटांनी घरी आणून सोडतो' असे सांगितले. कार निघाल्यानंतर संदीपने तिचा पाठलाग केला. कार लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर शुभमचा मृत्यू झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, मारहाणीचे नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली असून, आरोपींच्या मागावर पथके पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments