अक्कलकोट : कुरनूर धरणात पाणीसाठा वाढला; बळीराजा सुखावला

अक्कलकोट: अक्कलकोट शहरासह तालुक्यात सलग दोन दिवसांत आठ तास कधी मुसळधार तर कधी रिमझिम असा पाऊस झाला. पावसाचा प्रवाह एवढा वेगाने होता की, अशा स्थितीतही बासलेगाव-गेळोरगी रस्त्यावरील ओढ्यावरुन दुचाकी चालवणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी वाचवले.
या पावसामुळे कुरनूर धरणासह विविध साठवण तलावात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन तास तालुक्यात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ असे सलग सहा तर गुरुवारी दोन असे आठ तास कधी मुसळधार तर कधी रिमझिम असा पाऊस झाला. हा पाऊस अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, चपळगाव, शिरवळ, वागदरी, सलगर, तोळणूर, नागणसूर, तडवळ, करजगी, मगरुळ, जेऊर, अक्कलकोट स्टेशन, शावळ, हिळ्ळी, बबलाद, व्यागेहळ्ळी, हंजगी, गौडगाव, घोळसगाव, किरनळळी या मोठ्या गावांसह तालक्यात झाला.

तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरण गळोरगी, शिरवळवाडी, घोळसगाव, किरनळ्ळी येथील साठवण तलाव, हंजगी आदी गावच्या साठवण तलावात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच तोरणी, खानापूर, गळोरगी, कोन्हाळी, मुंडेवाडी, बोरोटी बु, भोसगे, मुगळी, मराठवाडी, गुडेवाडी, दोड्याळ, घुंगरेगाव, बासलेगाव आदी गावातून पावसाचे पाणी ओढा वाहिल्यासारखे वाहत होते. या गावच्या परिसरातील लहान-मोठे ओढे भरुन वाहिले.


Comments