हरित सोलापूरसाठी बनवले ‘सीडबॉल’, पर्यावरणप्रेमींचा उपक्रम
सोलापूर - माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजीव करायचे. त्यात विविध बिया घालून छोट्या बॉलसारखे गोळे तयार करायचे. सीडबॉल तयार झाल्यानंतर ते वाळवून घ्यायचे. निसर्ग भ्रमंती, ट्रेकिंग, सहलीदरम्यान ते सीडबॉल टाकायचे. पावसाळ्यात हे बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि रोपाचे झाडात रूपांतर होऊन ‘सोलापूर हरित’ होईल. यासाठी अबालवृद्ध एकवटले. निमित्त होते, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको फ्रेंडली क्लब पर्यावरणप्रेमींनी आयोजिलेल्या ‘सीडबॉल’ (बीजगोळे) तयार करण्याच्या कार्यशाळेचे.
सोमवारी जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्ताने रविवारी स्मृती उद्यान येथील सुभेदार पेठकर यांच्या शेतामध्ये ‘सीडबॉल’ तयार करण्याची कार्यशाळा झाली. शहर परिसरातून १०० पेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी सहभागी झाले. वकील, प्राध्यापक, जिल्हा परिषद शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केल, युगंधर फाउंडेशन, रानवेध निसर्ग मंडळ, सामाजिक वनीकरण संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले.
निसर्ग माझा सखा ग्रुपतर्फे कार्यशाळेचे नेटके नियोजन केले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मनोज देवकर, भाऊराव भोसले, प्रचेत बागेवाडीकर, दत्ता म्हेत्रे, कृष्णा जाधव, संतोष धाकपाडे, प्रा. चंदा सोनकरण, सुप्रिया बाबा यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेच्या निमित्ताने गेल्या महिन्यात प्रकाश आमटे यांच्या आनंदवन येथील सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरातील अनुभव मनोज देवकर, राजाराम कानतोडे यांनी उपस्थितांना सांगितला.
बिया
तुळस,जांभूळ, करवंद, फणस, टरबूज, खरबूज, कलिंगड, आंबा या रानमेव्यासह बहावा, सोनमोहर, करंज, कडूनिंब, केलासपती, चिंच, वड, पिंपळ यासह स्थानिक प्रजातीच्या इतर झाडांच्या बिया गोळा केल्या होत्या.
Comments