शिवभोजनालय केंद्र सुरू करण्याच्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर:-कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीत गरीब आणि गरजू लोकांना भोजन उपलब्ध व्हावे यासाठी शिवभोजनालये केंद्रे उद्या पासून सुरू करण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शहरातील शिवभोजन केंद्र चालकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अन्न धान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील उपस्थित होते. याबाबत राज्य शासनाने काल सूचना दिल्या होत्या. सोलापूर शहरात पाच ठिकाणी शिवभोजनालय केंद्रे आहेत.

शिवभोजन केंद्रे दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरू राहतील. शिवभोजन चालकांनी ग्राहकांना शक्य तो आवेष्टीत स्वरुपात भोजन उपलब्ध करुन देण्याचे आहे. शिवभोजन तयार करणा-या व्यक्तींनी हात स्वच्छ धुवावे, मास्कचा वापर करावा. प्रत्येक ग्राहकामध्ये कमीत कमी तीन फुट अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शिवभोजन केंद्र चालकांना दिल्या.

जिल्हा प्रशासनातर्फे घरपोच किराणा सामान मिळण्यासाठी दुकानांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या दुकानांतून किराणा सामान मागवुन घ्यावे; जेणे करुन घराबाहेर पडावे लागणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती घेणे अथवा तक्रार नोंदविण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. 0217-2731020 असा या नियंत्रण कक्षाचा नंबर असुन नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

Comments