महिलांचा आधार गेला; ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
महिलांचा आधार गेला; ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
सोलापूर: सोलापुरातील ज्येष्ठ नाट्य कलावंत, सामाजिक कार्यकर्त्या, वक्त्या ॲड. अपर्णा अरूण रामतीर्थकर (वय ६५) यांचे अर्धांगवायुच्या आजाराने मंगळवारी दुपारी सोलापुरात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नातू असा परिवार आहे.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या अपर्णा रामतीर्थकर सोलापुरात आपले दिवंगत पती तथा ज्येष्ठ पत्रकार अरूण रामतीर्थकर यांच्याबरोबर आल्या आणि सोलापूरकर झाल्या. त्या उत्तम हौशी नाट्य कलावंत होत्या. हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरे वाचविली पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘पाखर संकुल’, ‘उद्योगवर्धिनी’ आदी संस्थांशी त्यांचा संबंध होता.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.
अपर्णा रामतीर्थकर यांची युट्यूब वर अनेक भाषणे लोकप्रिय आहेत त्यांच्या व्हिडिओना लाखो व्ह्यूज आहेेेत.’चला नाती जपूया’, ‘सासू-सुनेनी कसे रहावे’, ‘आई’, ‘एकत्र कुटुंब पद्धती आणि मुली’ या विषयांवरची त्यांची व्याख्याने खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहेत.
त्यांच्या निधनामुळे अनेक मुलींची आई गेली तर अनेक सुनांची प्रेमळ पण कर्तव्यकठोर सासू गेली अशी प्रतिक्रिया समाज माध्यमांमधून व्यक्त होत आहे.


Comments