माढ्या’त 1 जून पासून तीन दिवस जनता कर्फ्यू

कोरोनाचा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरकाव लक्षात घेता माढा शहर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक जून पासून तीन दिवस जनता कर्फ्यू असणार आहे.


देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माढा नगरपंचायतीच्या वतीने माढा शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवा वगळता 1जुन ते 3 जुन या कालावधीत माढा शहरातील सर्व दुकाने बंद राहतील असे माढा नगरपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. काल सायंकाळी जनता कर्फ्यूच्या संर्दभात शहरातील व्यावसायिकांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळेस माढ्यातील व्यावसायिकांचे मत जाणून घेऊन त्यांना सोलापूर शहरा बरोबर ग्रामीण भाग वैराग,शेंद्री, करकंब, सारख्या माढा शहराच्या नजीकच्या गावात कोरोनाचा होत असलेला शिरकाव पाहता आपल्या शहराला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून तीन दिवस माढा शहर बंद ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे नगराध्यक्षा मिनलताई साठे व मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी सांगितले.

शहरातील वैद्यकीय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहतील .फक्त दुध विक्री व पिण्याचे पाणी दुपारी 12 वाजे पर्यंत सुरू राहतील. भाजीपाला, फळे, विक्री बंद राहील. या वेळेस बोलत असताना कोरोनाच्या संसर्गा पासून वाचण्यासाठी शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करत काळजी घ्यावी असे आवाहन दादासाहेब साठे यांनी केले.

या बैठकीस नगराध्यक्षा मिनलताई साठे ,दादासाहेब साठे,मुख्याधिकारी चरण कोल्हे, माढा पोलिस स्टेशनचे स.पो.निरीक्षक अमोल कादबाने, उपनगराध्यक्ष लक्ष्मीबाई राऊत ,आरोग्य सभापती शिला खरात, सुप्रिया बंडगर,विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे, राहुल लंकेश्वर , सर्व नगरसेवक व व्यापारी उपस्थित होते.

Comments