अनोखा विवाह : साध्यापणाने लग्न करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली मदत

करमाळा : लग्न हा नवरा-नवरीच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपला विवाह रद्द करावे लागले. परंतु कंदर (ता. करमाळा) मधील काळे कुटुंबाने मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. तर नवदांपत्य यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ हजाराचा निधीचा चेक तलाठी व पोलीस पाटील यांच्याकडे देऊन कोरोनाच्या लढ्यात आपणही सहभागी असल्याचे दाखवून दिले.


कोरोनामुळे अनेकांनी आपले विवाह रद्द करून ते दिवाळीत करण्याचे योजले आहे. परंतु, काळे कुटुंबियांनी कमी खर्चात लग्न उरकून काही निधी कोरोनाच्या लढ्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. कंदर येथील रघुनाथ काळे यांचे चिरंजीव नवनाथ व गोरख आधिकराव ताटे यांची कन्या उज्ज्वला यांचा विवाह ९ एप्रिल रोजी होणार होता पण लाँकडाऊन असल्याने विवाह सोहळा होऊ शकला नाही.

परंतु कोरोना संसर्गाच्या काळात हा विवाह घरातच करण्याचा निर्णय काळे व ताटे कुटुंबाने केला. त्यानुसार कुटुंबाने शासनाची परवानगी घेऊन विवाह रविवार, २४ एप्रिल रोजी मोजकेच नातेवाईक यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. यावेळी तोंडाला मास्क बांधून व फिजिकल डिस्टन्स राखून हा समारंभ झाला. अन्य नातेवाईक व मित्रपरिवार यांनी या नववधू-वरांना सोशल मीडियाद्वारे व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, विजय-प्रताप युवा मंचचे अध्यक्ष शिवशंकर माने, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, तलाठी उमेश बनसोडे, पोलीस पाटील धन्यकुमार सुरवसे, आखलाक जहागीरदार, विठ्ठल काळे व इतर नातेवाईक उपस्थित होते.

Comments