सोलापूर जिल्ह्यातील शिवछत्रपतींचे वारसदार !

 

सोलापूर जिल्ह्याला प्राचीन इतिहास असला तरी मध्ययुगीन कालखंडात आदिलशाही, नगरची निजामशाही यांच्या वर्चस्वामुळे या गावाला अधिक महत्त्व आले. त्यातच इ.स. १६८५ ते १६९९ पर्यंत औरंगजेबाचा मुक्काम सोलापूर व परिसरात पडल्याने मोगल-मराठे युद्धात सोलापूर हे केंद्रस्थानी राहिले होते. मोगलांच्या पाऊलखुणा सोलापूर, मंगळवेढा, अकलूज येथील किल्ल्यात व ब्रह्मपुरीसारख्या छोट्या गावात सहजपणे जाणवतात.

 

मुस्लिम सत्ताधीशांकडे राजकीय पाठबळ असल्याने त्यांचा इतिहास लिखित स्वरूपात पाहण्यास मिळतो. परंतु जिथं हातात भाकरी घेऊन स्वराज्यासाठी वणवण भटकणा-या मराठ्यांचा इतिहास संकल्पनेतून साकार करावा लागतो.

दुर्दैवाने फक्त सोलापूर परिसराचाच विचार केला तर शिवछत्रपतींचा संबंध या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेला असला तरी पुढील वारसाची व त्यांच्या ऐतिहासिक स्थळाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.

तसे पाहिले तर सोलापूर जिल्ह्यातील जिंती हे गाव भोसले घराण्याचे वेरूळनंतरचे मूळ वतनाचे गाव. आजच्या करमाळा तालुक्यातील जिंतीला बाबाजीराजे भोसलेंना नगरच्या निजामापासून जहागिरीत दिलेले

होते. त्यामुळे बाबाजी, मालोजी व त्यानंतर शहाजीराजांचे वास्तव्य अधूनमधून जिंतीत राहिले होते. १६४५ साली जिजाऊसाहेबांनी जिंतीचे कुलकर्णी विभाजी रंगनाथ सोनटक्के यांच्या पत्नी भानाबाईला १०८ चावर जमीन दान दिल्याचा संदर्भ सापडतो. त्यामुळे स्वराज्य स्थापनेत पुण्याबरोबरच जिंतीकडे त्यांचे वास्तव्य होते हे स्पष्ट होते. तसं पाहिलं तर पुण्यापासून जवळच भीमा नदीवरील हे गाव आहे.

स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर जिंती हे शिवरायांचे थोरले बंधू संभाजी महाराजांकडे सोपविले होते. कारण इ.स. १६५४ साली संभाजी महाराज हे आदिलशाहीकडून लढताना कनकगिरीच्या युद्धात मरण पावल्यानंतर त्यांच्या पत्नी मकूबार्इंचा मुक्काम शेवटपर्यंत जिंतीतच राहिला. आजही आपणास जिंती या ठिकाणी मकूबाई यांची समाधी पाहण्यास मिळते. भोसलेंचा पडिक वाडा व इतर काही अवशेष तेथे उपलब्ध आहेत.

शिवरायांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी ही काकासाहेब भोसले जिंतीकरांनीच पार पाडलेली होती. तर पुढे छत्रपती संभाजीराजांनी जिंतीकरांना सेनासाहेब सुभा हा किताब दिला होता. त्यामुळे जिंती हे शिवरायांचे मूळ गाव म्हणता येईल. याप्रमाणे त्याचा लौकिक असला तरी इतर ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे त्यांचीही दुरवस्था आहे. भोसल्यांचे वारसदार आपल्या परिने ती दूर करण्याचा प्रयत्न करताहेत.

शिवरायांचे नातू व छत्रपती राजारामांचा मुलगा दुसरे शिवाजी यांना रामराजे व दर्याबाई ही दोन मुलं असून दर्याबाईचा विवाह पानगावातील निंबाजी निंबाळकरांशी झालेला होता. पानगाव हे सोलापूर-बार्शी रस्त्यावरील वैरागपासून ६-१० कि.मी. वरील एक ऐतिहासिक गाव. पुढे सातारा आणि कोल्हापूर घराण्यातील अंतर्गत भांडणामुळे रामराजांच्या जीविताला धोका असल्याने छत्रपती रामराजाच्या पत्नी ताराबार्इंनी त्यांना आपली नात दर्याबाईकडे पानगावला ठेवले. रामराजे १६४५ ते ५० असे पाच वर्षे इथे वास्तव्यास असून छत्रपती शाहूराजांच्या निधनानंतर याच रामराजांनी सातारला जाऊन छत्रपतीपद सांभाळले. तर निंबाजी निंबाळकरांना त्यांनी मराठी फौजेचे सेनापतीपद बहाल केले होते.

आज पानगावात छत्रपती रामराजे वास्तव्यास असणा-या वाड्याची मातीसुद्धा लोकांनी शिल्लक ठेवलेली नाही. परंतु जवळपास २०० २०० फूट आकाराचा घडीव दगडात बांधलेला हत्ती तलाव अजूनही सुस्थितीत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर सैन्याची छावणी असावी हे स्पष्ट होते. त्यानुसार पानिपत व राक्षसभुवनच्या लढाईला जाताना मराठ्यांच्या फौजा पानगावात मुक्कामास असल्याचा संदर्भ सापडतो. तर रामराजेंच्या काळात निंबाजी व दर्याबार्इंनी सातारची गादी सांभाळण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. पानगावच्या बाजूला कोरफळे येथे शिवरायांच्या वारसदारांची आमराई असल्याचा उल्लेख सापडतो. पुढे वैराग-पानगाव घराण्यातील निंबाळकरांची मुलगी कमळजाबार्इंचा विवाह कोल्हापूरच्या छत्रपतींशी झालेला होता. तसेच याच घराण्यातील हणमंतराव मकरंद निंबाळकर हे स्वराज्याचे सेनापती राहिलेले आहेत. त्यामुळे शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात येथील निंबाळकरांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

आज वैराग येथील हत्तीखाना व दोन मोठे बारव इतिहासाचे साक्षीदारआहेत. ज्यांच्या कालखंडात पानिनाचे युद्ध झाले तो राजा पानगावसारख्या छोट्या गावाने पाच वर्षे सांभाळला. विशेष म्हणजे तो शिवरायांचा पणतू होता हे खास आहे. आज हे पानगाव किती जणांना माहीत आहे हाच खरा प्रश्न आहे. शिवरायांच्या वारसांचा तिसरा उल्लेख माळशिरस येथे सापडतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस हे तालुक्याचे गाव असून तेथे गावाबाहेर ओढ्याकाठी शिवरायांची मुलगी सखूबाईची समाधी आहे. शिवरायांना एकूण ६ मुली व २

मुले अशी ८ अपत्ये असून संभाजीराजांच्या भगिनी असलेल्या सखूबार्इंना फलटणच्या महादजी बजाजी नाईक निंबाळकरांना दिलेले होते. संभाजीराजांच्या आई सईबाई या याच घराण्यातील असून फलटणचे निंबाळकर असोतकी अन्य व्याही व जावई हे शेवटपर्यंत विजापूरच्या आदिलशहाकडून लढले. तरीपण शिवरायांचे प्रेम कायम होते. कारण आपल्या मुलीच्या चोळी-बांगडीकरिता राजांनी वाल्हे नावाचे गाव विकत घेऊन ते दान दिले होते.

शिवकालीन पत्रसार संग्रहात याची नोंद दि.२७ ऑक्टोबर १६५७ याप्रमाणे सापडते. महादजी आदिलशहाकडे असले तरी शिवराय व त्यानंतर संभाजीराजे आणि राजाराम महाराजांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कारण राजांच्या मृत्यूनंतर दोन भावांमध्ये काही प्रमाणात बेबनाव झाल्याने महादजींनी आपल्या मेव्हण्यांमध्ये समेट घडवून आणला होता. एवढेच नाही आदिलशाही चाकरीत असूनही त्यांनी संभाजीराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थिती लावली होती. अकलूजच्या मोहिमेवर असताना महादजींचा मृत्यू झाला. अकलूज आणि माळशिरस ही जवळजवळ असणारी गावे असल्याने व मध्ययुगात अकलूज हे जिल्ह्याचे गाव असल्याने माळशिरसऐवजी अकलूजचा उल्लेख आलेला असावा. पतीच्या मृत्यूनंतर सखूबाई सती गेल्या.

माळशिरसच्या बाहेरील बाजूस ओढ्याकाठी सखूबार्इंची समाधी आहे. समाधीची अवस्था त्यामानाने चांगली असली तरी बाजूचा परिसर मात्र गलिच्छ आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडकी नावाच्या गावात आपले थोरले बंधू संभाजी महाराजांच्या नावाने संभापूर नावाची एक पेठ वसविली असल्याचा उल्लेख सापडतो. याविषयी विशेष करून संशोधन झालेले नाही. मांडकी हे गाव माळशिरस तालुक्यात असून ते अकलूजच्या जवळच आहे. मांडकीचा संदर्भ कुठल्या अर्थाने घेतलेला आहे हे पाहणे गरजेचे आहे.

अशारीतीने मध्ययुगीन कालखंडात सोलापूर परिसराचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी आलेला होता हे स्पष्टपणे दिसून येते. विशेषत: जिंतीसारख्या गावात तर राजांचा पदस्पर्श झालेला आहे. तर इतरही गावे शिवराजांचा वारसा जपलेली आहेत. शिवरायांसोबत त्यांच्या वारसाविषयी अधिक माहिती घेऊन तो वारसा जपला तर इतिहासाला ते एक नवीन दालन निर्माण होऊ शकते. वारसा जपताना आपणही कुठे तरी कमी पडलो नाही ना? याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

डॉ. सतीश कदम

Comments