MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला
MPSC Result 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२४ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. मुख्य परीक्षा आणि त्यानंतरच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री निकाल प्रसिद्ध करण्यात आला.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. एकूण ७,९७० उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी ७,७३२ उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. परीक्षेनंतर १५१६ उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली, त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
यंदा सोलापूरचा विजय नागनाथ लामकणे राज्यात पहिला क्रमांक पटकवला, तर हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक पटकवला. आणि अनुसूचित जाती (sc) प्रवर्गातून नागपूरची प्रगती जगताप ही राज्यभरात पहिली आली आहे. सोलापूरचा विजय नागनाथ लामकणे हा मूळचा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावचा आहे.
विजय यांनी सांगितले की, “मला 2023 मध्ये ही परीक्षा दिली होती, तेव्हा मला सहावा क्रमांक मिळाला होता. पण उपजिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न असल्यामुळे मी पूर्ण प्रयत्न केले आणि यंदा राज्यात पहिला क्रमांक मिळवला. 2021 पासून मी एसटीआय, दुय्यम निबंधक, गटविकास अधिकारी अशा विविध पदांवर काम करत आलो आहे.”
विजय पुढे म्हणाले की, “माझ्या स्ट्रॉंग पॉइंटवर मी लक्ष केंद्रित केले. डिस्क्रिप्टिव आणि मुलाखतीत अनुभव नव्हता, पण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा चांगली झाली. २०२२ मध्ये एमपीएससी टॉपर विनायक पाटील यांचा मार्गदर्शन मी फॉलो केला. मर्यादित स्रोतांवर आणि कमाल रिव्हिजनवर काम केल्यामुळे हे यश मिळाले.”
विजय यांनी अभ्यासाच्या तासांबाबत सांगितले की, “अभ्यास किती वेळ करावा, हे महत्त्वाचे नाही. मी सुमारे सात ते आठ तास दररोज अभ्यास करत होतो. राज्यसेवेचा अभ्यास मी जॉब करत करत केला. आई-वडीलांचे संपूर्ण सहकार्य मिळाले, जे फार महत्त्वाचे होते. जिथे मी शिकलो, तेथे ते माझ्यासोबत होते.”
विजय लामकणे यांच्या वडिल शेती करतात तर आई गृहिणी आहेत. विजय म्हणाले की, “आई-वडिलांची इच्छा होती की मी पुढे जाऊन काही राहिले नको, म्हणून मी ही परीक्षा दिली आणि पास झालो.” त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “अशक्य काहीही नाही, फक्त मानसिक तयारीवर अवलंबून आहे. घरची परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे.”

Comments