सोडून गेलेली बायको परत मिळावी म्हणून थेट गाढविणीशी केलं लग्न; सोलापूरातील अजब प्रकार

 आपल्याला सोडून गेलेली बायको परत मिळावी म्हणून दीपक सूर्यवंशी या व्यक्तीने सोमवारी गाढविणीसोबत प्रतीकात्मक विवाह केला.


सोलापूर - आपल्याला सोडून गेलेली बायको परत मिळावी म्हणून दीपक सूर्यवंशी या व्यक्तीने सोमवारी गाढविणीसोबत प्रतीकात्मक विवाह केला. जिल्हा परिषद, पूनम गेटसमोर सोमवारी दुपारी हे अनोखं आंदोलन झालं. या प्रकरणी पोलिसांनी सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं. रात्री १०.३० पर्यंत पोलीस कारवाईबाबत निर्णय घेत होते.

सूर्यवंशी १५ दिवसांपासून पूनम गेटसमोर आंदोलनाला बसले आहेत. ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाला निवेदन दिले होते. आपला १६ वर्षाचा संसार तुटला. या प्रकरणात पत्नीच्या नात्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.

प्रशासनाकडून या प्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नसल्याने गाढविणीसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी सोमवारी एक गाढवीण आणली. मंगलाष्टके आणि गाढविणीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करून त्यांनी हा प्रतीकात्मक विवाह केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी सूर्यवंशी यांना थेट पोलीस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत ते तिथेच थांबून होते.

लग्न ही महाराष्ट्रातील गंभीर समस्या झाली आहे. अनेक तरुणांचे विवाह जुळत नाहीत. मुलांबद्दल मुलीकडचे लोक अनेक अपेक्षा ठेवून असतात. त्यामुळे लग्नाळू तरुण व्यसनाधीन झाले आहेत. आता मला माझा संसार करायचा आहे. त्यामुळे मी प्रतीकात्मक आंदोलन केले. जिल्हा परिषदेसमोर गाढव फिरत असतात. तिथूनच या गाढवांना ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करावी.

Comments