सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा एल्गार
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) बचावसाठी तीव्रपणे आंदोलन करून राजकीय दबाव वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार व न्यायालयीन लढाई लढणार, असे दोन गट निर्माण करून कार्य सुरू ठेवण्याचे ठरले आहे. हा ठराव पुणे येथे माजी विद्यार्थी मेळाव्यात मंजूर करण्यात आला.
5 मार्च 2017 रोजी वेंकटेश ग्राफिटी मुंढवा, पुणे येथे सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन माजी विद्यार्थ्यांचा मेळावा 2017 हर्षउल्हासित वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विलास कानगुटे 1981 इलेक्ट्रिकल बॅचचे अभियंता यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने आदल्या दिवशी अचानक मृत्यू झाला. त्यांनी कोयना प्रोजेक्टवरती उल्लेखनीय कार्य केले होते व तद्नंतर कार्यकारी अभियंता या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. समन्वयक युवा उद्योजक मनोज गायकवाड यांनी सोलापूर गव्हर्मेंट पालिटेक्निक बचाव कृती समितीच्या कार्याचा पूर्ण आढावा सादर केला. त्यावर चर्चेअंती आणखी तीव्रपणे आंदोलन करून राजकीय दबाव वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी व न्यायालयीन लढाईसाठी, असे दोन वेगळे गट निर्माण करून कार्य सुरू ठेवण्याचे ठरले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असल्याने न्यायालयीन लढ्याला विलंब होत असल्याची माहिती दिली. 1963 ते 2014 ब्रँचचे 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

Comments