जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी रोहिणी बरसल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण

मोहोळ (सोलापूर) : रोहिणी नक्षत्राच्या पावसाने मोहोळ तालुक्‍यात बऱ्यापैकी हजेरी लावली असून हा पाऊस रब्बी पेरणीस पोषक आहे. आतापर्यंत तालुक्‍यात आठ महसुली मंडळांत एकूण 48.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सरासरी 6.6 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.


अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे शेतकरी हैराण
गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे शेतकरी हैराण झाला होता. पिकांना कितीही पाणी दिले तरी पिके सुकत होती. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपूर्वी उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग या पिकांसह द्राक्ष, डाळिंब, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे. सध्या मोहोळ तालुक्‍यात द्राक्ष, डाळिंब, बोर बागांच्या छाटण्या सुरू आहेत. काही ठिकाणी ऊस लागवडही सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने पेरणीसाठी तातडीने मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)-
मोहोळ- 11, नरखेड- 5, कामती- 4, पेनूर- 2.5, वाघोली- 7, सावळेश्‍वर- 5, शेटफळ- 1, टाकळी सिकंदर- 13

सांगोल्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस 
सांगोला : सांगोला तालुक्‍यात सलग दुसऱ्या दिवशी रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाला असून शेतकरी सुखावला आहे. तालुक्‍यात सरासरी 11.55 तर एकूण 104.00 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्‍यात रोहिणी नक्षत्राच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता खरीप पेरणीकडे लागले आहे. तालुक्‍यात सोमवारी पहाटे सरासरी 15.55 तर एकूण 140 मिलिमीटर पाऊस झाला होता. कालच्या पावसानंतर आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी व रात्री तालुक्‍यात अनेक भागांत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. हा पाऊस खरीप पेरणीसाठी अतिशय पोषक आहे. तालुक्‍यात खरिपात सर्वांत जास्त 20 हजार हेक्‍टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर बाजरी पिकाची पेरणी होती. त्याखालोखाल मका, तूर, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, इतर पिकांची पेरणी केली जाते. रात्री व मंगळवारी सकाळपर्यंत तालुक्‍यात दुसऱ्या दिवशी 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून महूद, संगेवाडी, कोळा, शिवणे मंडलमध्ये चांगला पाऊस झाला आहे. नाझरे मंडळमध्ये पावसाची नोंद झाली नाही. पावसाने शेतकरी सुखावला असला तरी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पावसाची नोंद (मिलिमीटर पाऊस) 
सांगोला- 4, हातीद- 4, महूद- 35, संगेवाडी- 25, सोनंद- 7, जवळा- 4, कोळा- 15, शिवणे-10 अशी तालुक्‍यात एकूण 104 तर सरासरी 11.55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

करमाळा तालुक्‍यात पावसाची सुरवात 
केत्तूर : गेल्या अडीच म
न्यांपासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावात उकाड्याने हैराण झालेल्या करमाळा तालुकावासीयांना पावसाने दिलासा दिला आहे. वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतीची खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी आता पेरणीच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. मध्यतंरी मान्सूनपूर्व वादळी वारे व पावसामुळे नुकसान झाले होते. त्यानंतर उष्णतेत मात्र मोठी वाढ झाली होती. या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच ऋतूनुसार 1 जून रोजी पाऊस सुरू झाल्याने वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसह पशुपक्षी, झाडे, वेली आदींना थोडाफार दिलासा मिळाला आहे.


Comments