कोरोनाचे संकट टळल्याशिवाय कोणत्याही धर्माची प्रार्थनास्थळे खुली करू नयेत

सांगोला : सध्या संपूर्ण मानवजातीवर कोरोनाचे संकट आहे. तरीही कोरोनाचे संकट जोपर्यंत समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत राज्यातील सर्व धर्माची प्रार्थनास्थळे खुली करू नयेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष व माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.


सध्या केंद्र सरकारने देशभर सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे खुली करण्यास मुभा दिली आहे. परंतु आपल्या राज्यात 30 जून पर्यंत तरी त्याची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. परंतु पुढे जाऊन खुली करण्यास मुभा दिली तर आपला भारतीय समाज हा श्रद्धावान व भावनिक असल्यामुळे बाजार आणि मॉलपेक्षा धार्मिक प्रार्थनास्थळामध्ये जास्त गर्दी करेल. इतर ठिकाणची गर्दी नियंत्रित करणे शक्य आहे. परंतु भावनिकदृष्ट्या गुंतलेली प्रार्थनास्थळातील गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार नाही. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.

तसेच राज्यातील शाळा सुरू करण्याचा सरकारचा मनोदय आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. जिथे कोरोनाचा थोडासुद्धा प्रादुर्भाव नाही तिथे मुले थेट शाळेत जातील असे दिसते. तर जिथे कमी जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तिथे ऑनलाइन शिक्षण देण्याची तयारी शासनाने केलेली दिसते. परंतु किमान 30 ते 40 टक्के शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होत नाहीत किंवा ती उपलब्ध करून घेण्याइतपत तेवढी त्यांची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शाळा उघडण्याची तारीख आणखी पुढे ढकलावी. कारण गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांची उपलब्धता झाल्यानंतरच शाळेचे दरवाजे उघडावे, अशी मागणी सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने केली आहे.

रोगराई रोखण्यात सफाई कामगारांचे महत्त्वाचे योगदान असते. परंतु त्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. तरी त्यांना आरोग्यविषयक सुविधा व सुरक्षा उपकरणे जी डॉक्टरांना दिली जातात, त्या सर्व सुविधा व सुरक्षा उपकरणे सफाई कामगारांनाही देण्यात याव्यात. अशीही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे व कार्याध्यक्ष तथा माजी सहा. पोलिस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.

Comments