सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले 516 नवीन रुग्ण

सोलापूर : मार्च महिन्यापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज सोलापूर शहर व जिल्ह्यात तब्बल 516 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. महापालिका हद्दीत 217 तर ग्रामीण भागात 299 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातील दोन व्यक्ती ग्रामीण भागातील तर दोन महापालिका हद्दीतील आहेत. 



कोरोना चाचणीचे 1 हजार 360 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामध्ये 1079 अहवाल महापालिका हद्दीतील तर 281 अहवाल ग्रामीण भागातील आहेत. रुग्णालयात सध्या तीन हजार 719 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 1 हजार 993 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 1 हजार 726 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. आज एकाच दिवशी 151 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यातील 84 जण महापालिका हद्दीतील तर 67 जण ग्रामीण भागातील आहेत. 

आजच्या अहवालांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील सुशील नगर येथील 72 वर्षीय पुरुष व बाळे परिसरातील शिवाजीनगर येथील 59 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात बार्शीतील परांडा रोड येथील 65 वर्षिय पुरुष व करमाळा तालुक्‍यातील देवळाली येथील साठ वर्षिय पुरुष यांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

शहर व जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 58 हजार 207 झाली आहे. त्यातील 43 हजार 604 बाधित हे ग्रामीण भागातील असून 14 हजार 703 बाधित महापालिका हद्दीतील आहेत. आत्तापर्यंत 52 हजार 673 जण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत 1 हजार 915 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 1 हजार 218 ग्रामीण भागातील तर 697 जण हे महापालिका हद्दीतील आहेत.

Comments