कार्तिकी एकादशी; चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी

कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात ७ लाख वारकरी दाखल झाले आहेत. भाविक चंद्रभागेत स्रान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. वाळवंटात व पंढरपुरात सर्वत्र टाळ-मृदंग आणि विठूनामाच्या गजरात भाविक तल्लीन झाले आहेत. कार्तिकी एकादशीदिवशी पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होत आहे.

श्री विठ्ठलाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोचली असून दर्शनासाठी १० ते १२ तास लागत आहेत. भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिर समितीने नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने चोख उपाययोजना केली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची महापूजा रविवारी पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडणार आहे.

विठ्ठल दर्शनाची ओढ असलेल्या भाविकांनी गेल्या तीन दिवसांपासून लाखोच्या संख्येने पंढरीत हजेरी लावली आहे. एस.टी महामंडळाकडून भाविकांसाठी बसची व्यवस्था केली आहे. एसटी बस, रेल्वे आणि खाजगी वाहनांनी येणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. शहरातील मठ आणि सर्व संतांची मंदिरे हाउसफुल्ल झाली आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, ६५ एकर भक्ती सागर परिसर, स्टेशन रोड, नवीन बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरासह छोटे मोठे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. वाहनांसाठी मोफत पार्किंगची व्यवस्था केली आहे. स्वच्छतेसाठी नगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांची नेमणूक केली आहे.

दर्शन रांगेत जेवण, फराळाची सोय

दर्शन रांगेत भाविकांना त्रास होऊ नये या साठी मंदिर समितीच्या वतीने विशाल अशा बारा पत्रा शेडची निर्मिती केली आहे. अहोरात्र दर्शन रांगेत उभारणा-या भविकांसाठी मोफत जेवणाची व एकादशी दिवशी फराळाची सोय केली आहे. पिण्याचे पाणी तसेच विश्रांतीची व्यवस्थाही केली आहे.

पंढरपुरात दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी

दर्शन रांगेत भाविकांसाठी चहा पान आणि अन्नदानाचे काम काही स्वयंसेवी संस्था करीत आहेत. पंढरपुरातील प्रमुख मार्गांवर विद्युत रोषणाई केली असून लाईटच्या खांबावर रंगीबेरंगी लाईट लावली आहेत. यामुळे पंढरपूर नगरी अधिकच खुलून दिसत आहे. परिणामी दिवाळीनंतर पंढरपूर शहरात पुन्हा दिवाळी आल्याचे चित्र वाटत आहे.

Comments